
.रिपोर्टर..:
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 साठीची आदर्श आचारसंहिता भारत निवडणूक
आयोगाने जाहीर केली असून तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
बी. राधाकृष्णन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक 2014 आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत झालेल्या बैठकीत श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर. बर्गे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, नीता शिंदे, निशा कांबळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. जाधव आदी उपस्थित होते. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेताना श्री. राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडणे सर्वांचेच कर्तव्य आहे. प्रशासनातर्फे जिल्ह्यातील संवेदनशील भागात विशेष लक्ष केंद्रित करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनातील प्रत्येक घटकाने समन्वयाने काम करावे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पूर्णपणे पालन होईल याची काळजी घ्यावी. तसेच शांतताप्रीय जिल्ह्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक काळात होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून जनतेनेही याकामी सहकार्य करावे. श्री. जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊन निवडणूक यशस्वीतेसाठी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा सादर केला. |