. लातुर जिल्हयात आवकाळी पावसाने मोठे नुकसान
 
रिपोर्टर.लातूर जिल्ह्याला बुधवारी रात्री गारपीटीचा तडाखा बसला असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी लातूर तालुक्यातील पूर्व भागातील गावांना गारपीटीचा तडाखा बसला आणि काही वेळातच होत्यचे नव्हते झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली गारपीट गुरुवारी पहाटेपर्यंत सुरुच होती. औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागात गारपीटीने निर्यातक्षम द्राक्षबागा उदध्ववस्त झाल्या आहेत.

लातूर तालुक्यातील भाडगाव, सेलू, सोनवती, रमजानपूर, बोरी, बाभळगाव, मुशिराबाद, धनेगाव, भातागळी परिसराला गारपीटीचा तडाखा बसला आहे. उभ्या असलेल्या ज्वारीचे पाने इेखील शिल्लक राहिले नाहीत, गव्हाची अवस्थाही अशीच झाली, काढून ठेवलेला हरभरा डोळ्या देखत जमीनीत गारामुळे अच्छादला गेला.

चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पावसाळ्या सारखे औढे नाले वाहू लागले आहेत. वादळी वाऱ्याचा झंजावात अनेक मोठी झाडे जमिनदोस्त झाली आहेत.आंब्याच्या बागा निष्पर्ण झाल्या असून अनेकांच्या घरावरचे छप्पर उडून गेले आहेत.

औसा तालुक्यातील किल्लारी, लामजना परिसरात झालेल्या गारपिटीमुळे इतर पिका सोबतच या भागातील निर्यातक्षम द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले आहे. याच परिसरातील मंगरुळ, तळणी, येथील किमान १५० द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघटनेचे सचिव राजेंद्र बिराजदार यांनी सांगितले. नदी हत्तरगा, रामेगाव, लामजना या भागातील द्राक्ष बागातील घडाचा सडाच शेतात पडला होता. या परिसरातील दाळिंबाच्या बागाही उदध्ववस्त झाल्या आहेत.

वादळी वारे आणि गारपीटीमुळ जनावरे दगावली असून पक्षीही मृत्युमुखी पडले आहेत. किमान ११० पेक्षा जास्त विजेचे खांब, डीपी उखडून पडले आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार वैजनाथ शिंदे यांनी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. भाजपाने शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यानी बुधवारी निटुरला मदत तातडीने मिळावी या मागणी साठी रस्तारोको आंदोलन केले. शेतकरी संघटनेने लातूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील २२१ गावांना फटका

मंगळवारपर्यंत झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा जिल्ह्यातील २२१ गावांना बसला असून १२ हजार ९१३ हेक्टर वरील पिकांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. ४५ हजार ४३ हेक्टर वरील पिकाचे ५० टक्के पेक्षा कमी नुकसान झाले आहे. या वादळीवाऱ्यात वीज पडून लातूर तालुत्यात चार, रेणापूर दोन, चाकुर तीन अशी नऊ मोठी जनावरे दगावली आहेत. बुधवार आणि गुरुवार पहाटे झालेल्या आपत्तीचे पुन्हा पंचनामे करावे लागणार आहेत.