मतदार जनजागृतीसाठी आज उस्मानाबादेत रॅली
उस्मानाबाद,..रिपोर्टर  दि. 6- मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातही त्या अनुशंगाने विविध कार्यक्रम घेण्यात आले असून शुक्रवार, दि. 7 मार्च रोजी एका जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सकाळी 7 वाजता ही रॅली निघणार असून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील या रॅलीची सुरुवात करणार आहेत.
     जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघणारी ही रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, रामनगरमार्गे श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडिअम येथे जाईल. या रॅलीत खेळाडू, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय प्रत्येक तालुका मुख्यालयी दि. 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजता तहसील कार्यालयातून त्याचप्रमाणे शाळास्तरावरही रॅली काढण्यात येणार आहे.  मतदानाविषयी जागृती करणारे फलक या विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहेत. मतदान माझा हक्क-मी तो बजावणारच, मतदानाचा हक्क-पवित्र हक्क, मतदान करु राष्ट्र उभारु, मतदान करु लोकशाही बळकट करु, मतदान श्रेष्ठदान असे फलक विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहेत.
याशिवाय, 8 मार्च रोजी प्रत्येक तालुक्यील वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या समन्वयाने वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व हा या स्पर्धेचा विषय राहणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  
                                         ****