राज्यात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात 10, 17 व 24 एप्रिल 2014 रोजी मतदान - नितीन गद्रे

मुंबई .रिपोर्टर..: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 ची घोषणा केली असून राज्यात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत. निवडणूक घोषणा झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी आज विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात पहिला टप्प्यातील मतदान गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2014 रोजी, दुसऱ्या टप्प्यात गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2014 तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2014 रोजी होणार आहे.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्याचा दिनांक 15 मार्च 2014 रोजी, दुसऱ्या टप्प्यासाठी 19 मार्च 2014 तर तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्याचा दिनांक 29 मार्च 2014 आहे.

नामनिर्देश पत्रे सादर करण्याचा दिनांक पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 22 मार्च, 26 मार्च व 5 एप्रिल 2014 असा आहे. नामनिर्देश पत्राची छाननी करण्याचा दिनांक पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 24 मार्च, 27 मार्च व 7 एप्रिल 2014 असा आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 26 मार्च, 29 मार्च व 9 एप्रिल 2014 असा असून मतदानाचा दिनांक पहिल्या टप्प्यासाठी 10 एप्रिल दुसऱ्या टप्प्यासाठी 17 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी 24 एप्रिल 2014 असा आहे. मतमोजणीचा दिनांक शुक्रवार 16 मे 2014 रोजी असून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 28 मे 2014 असा आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणारे मतदारसंघ - 5 - बुलढाणा, 6 -अकोला, 7- अमरावती (अ.जा), 8- वर्धा, 9- रामटेक (अ.जा), 10- नागपूर, 11- भंडारा- गोंदिया, 12- गडचिरोली -चिमूर (अ.ज), 13- चंद्रपूर, 14- यवतमाळ- वाशिम.
दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणारे मतदारसंघ- 15 -हिंगोली, 16- नांदेड, 17- परभणी, 33- मावळ, 34- पुणे, 35 -बारामती, 36 -शिरुर, 37 -अहमदनगर, 38-शिर्डी (अ.जा), 39 - बीड, 40 उस्मानाबाद, 41 -लातूर (अ.जा), 42- सोलापूर (अ.जा), 43- माढा, 44- सांगली, 45- सातारा, 46 - रत्नागिरी- सिंधुदुर्ग, 47 - कोल्हापूर व 48- हातकणंगले.

तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणारे मतदारसंघ - 1- नंदुरबार (अ.ज), 2- धुळे, 3- जळगाव, 4-रावेर, 18-जालना, 19- औरंगाबाद, 20 -दिंडोरी (अ.ज), 21- नाशिक, 22- पालघर (अ.ज), 23- भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे, 26 -मुंबई (उत्तर), 27- मुंबई (उत्तर पश्चिम), 28- मुंबई (उत्तर पूर्व), 29 - मुंबई (उत्तर मध्य), 30- मुंबई (दक्षिण मध्य), 31- मुंबई (दक्षिण) व 32- रायगड असे मतदारसंघ आहेत.

आमदार सुभाष झनक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यातील 33-रिसोड या विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रमही घोषित झालेला असून या निवडणुकीसाठी दिनांक 10 एप्रिल 2014 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांचा वापर करण्यात आला आहे. दिनांक 31 जानेवारी 2014 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार राज्यात 7 कोटी 89 लाख 66 हजार 642 इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. यामध्ये 4 कोटी 18 लाख 41 हजार 916 पुरुष, 3 कोटी 71 लाख 24 हजार 456 महिला तर 270 इतर मतदार आहेत.

राज्यात अजूनही मतदार नोंदणी सुरु असून ज्यांचे मतदार यादीत नाव नाही असे मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदणी करु शकतात. मतदाराने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन श्री. गद्रे यांनी यावेळी केले.

निवडणूक संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ www.eci.nic.in वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी http://ceo.maharashtra.gov.in किंवा http://ceomaharashtra.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.