समाजकल्यान विभागाचे कार्यालय अधिक्षक साळुंके लाच घेताना जाळयात..

उस्मानाबाद  ..
रिपोर्टर.. : /आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यास ५0 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यासाठी त्यांच्याकडून ५ हजाराची लाच घेताना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर सीताराम साळुंके यास लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सांयकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास कार्यालयातच करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील विवेक संजय जाधव यांनी १३ मार्च २0१३ रोजी वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी ३0 डिसेंबर २0१३ रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाह योजनेचे ५0 हजार रूपये अर्थसहाय्य मिळावे म्हणून अर्ज केला होता.
काहीवेळा चकरा मारून जाधव यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक किशोर साळुंके यांनी विवेक जाधव यांना वारंवार मोबाईलवरून फोन करून 'फाईल तयार करतो, मंजूर करून घेतो, फाईल मंजुरीसाठी साहेबांकडे पाठविली आहे, कोणाकडे तरी पाच हजार रूपये पाठवून द्या, दोघे जण येऊन घेऊन जा', असे सांगितले. दरम्यान, विवेक जाधव यांनी ११ फेब्रुवारी रोजी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर सायंकाळी पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर व अपर पोलिस अधीक्षक पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नईम हाश्मी व त्यांचे सहकारी पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले, विश्‍वनाथ सिद, सपोफौ देशमुख, पोह दिलीप भगत, पोना सुधीर डोरले, पोकॉ बालाजी तोडकर, राजाराम चिखलकर यांच्या सहाय्याने समाजकल्याण विभागात सापळा रचून विवेक जाधव यांच्याकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुढील तपास पोनि अश्‍विनी भोसले या करीत आहेत. (प्रतिनिधी)