अपघातात पती-पत्नी ठार


येरमाळारिपोर्टर.. :  उभ्या असलेल्या ट्रॉलीवर दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना येरमाळा येथील ज्ञानदीप विद्यालयाजवळ शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात दीड वर्षाची बालिका बालंबाल बचावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बन सारोळा (ता.अंबाजोगाई, जि.बीड)येथील रामकिसन विश्‍वनाथ धाकतोडे (वय ३0) व त्यांच्या पत्नी पार्वती रामकिसन धाकतोडे (वय २५)हे दाम्पत्य त्यांची दीड वर्षाची मुलगी संध्या हिच्यासह शुक्रवारी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी दुचाकी (क्र.एमएच २५/ ए ८६५१) वरून गेले होते.रात्री गावाकडे परत जात असताना येरमाळा येथील ज्ञानदीप विद्यालयाजवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली (क्र.एमएच २५/ बी ४३६0)ला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली.
या अपघातात धाकतोडे दाम्पत्य जागीच ठार झाले.तर त्यांच्यासोबत असलेली दीड वर्षाची संध्या अपघातातून बालंबाल बचावली.अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी अच्युत शिवाजीराव मंठाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर ट्रॅक्टर ट्रॉली चालकाविरूध्द भादंवि कलम ३0४(अ)प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.तपास सपोनि एस.एस.चव्हाण करीत आहेत.