मैलारपूरच्या श्री खंडोबाची १६ जानेवारी रोजी यात्रा



नळदुर्ग  रिपोर्टर..- तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाची यात्रा दि. १६ जानेवारी (गुरूवार) रोजी भरत असून, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.
मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत असून, यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील किमान ५ लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. यंदाची यात्रा १५ जानेवारीपासून सुरू होत असून, यात्रेचा मुख्य दिवस १६ जानेवारी आहे.
१६ जानेवारी (गुरूवार) रोजी पहाटे ४ वा. श्रींची काकडा आरती होईल. त्यानंतर पहाटे ४. १० वाजता अभ्यंगस्नान व अभिषेक, पहाटे ४.१५ वाजता महावस्त्र अलंकार महापूजा, पहाटे ४. २० वाजता महानवैद्य तसेच दिवसभर नवससायाचे कार्यक्रम पार पडतील.
रात्री १२ वाजता अणदूर व नळदुर्गच्या नंदीध्वजाचे छबिन्याच्या घोड्यासह आगमन व शोभेचे दारूकाम होईल. मध्यरात्री २ वाजता अणदूर व नळदुर्गच्या मानक-यांचा सन्मान करण्यात येईल. मध्यरात्री ३ वाजता श्रींचा वाजत-गाजत घोडे, पालखी व नंदीध्वजासह छबिना निघेल. नदीकाठावरील मसोबा, जुने मंदिर व सध्याचे मंदिर असा पालखी मार्ग राहणार असून, पहाटे ५ वाजता पालखीची सांगता होईल.
शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी दु. २ वाजता नळदुर्ग नगरपरिषदेच्यावतीने जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली असून, मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर नळदुर्ग पोलिस स्टेशनच्यावतीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून श्री खंडोबा मंदिर समिती तसेच अणदूर-नळदुर्ग यात्रा कमिटीचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.