|
|
रिपोर्टर..- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात यांचे हक्क संपल्यामुळे
मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे. शनिवारी पहिल्या दिवशी श्री विठ्ठलाच्या
चरणाजवळ ठेवलेल्या दक्षिणा पेटीत 76 हजार 425 तर श्री रुक्मिणीमातेकडील
पेटीत 26 हजार 91 रुपये असे तब्बल 1 लाख 2 हजार 516 रुपये जमा झाले.
पूर्वीच्या पद्धतीनुसार समितीला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ही रक्कम जवळपास
चौपटीने जास्त आहे.
पहाटे मंदिर उघडल्यापासून रात्री
बंद करेपर्यंतच्या काळात कोणत्या बडवे आणि उत्पातांनी श्री
विठ्ठल-रुक्मिणीशेजारी उभे राहून देवाच्या पायाजवळ भाविकांकडून ठेवली
जाणारी दक्षिणा गोळा करायची, याचे लिलाव करण्याची येथे वर्षानुवर्षे पद्धत
होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा लिलाव बंद करण्यात आला.
कालपासून बडवे-उत्पात यांच्याऐवजी मंदिर समितीचे कर्मचारी श्री
विठ्ठल-रुक्मिणीशेजारी नियुक्त करण्यात आले आणि दोन्ही ठिकाणी देवाच्या
पायाजवळ दक्षिणा पेट्या ठेवण्यात आल्या. भाविकांनी देवाच्या पायाजवळ
दक्षिणा ठेवली तर समितीचे कर्मचारी ती रक्कम दक्षिणा पेटीत टाकत आहेत. नवीन
व्यवस्थेच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीकडे अनुक्रम 76 हजार
425 आणि 26 हजार 91 रुपये असे तब्बल 1 लाख 2 हजार 516 रुपये जमा झाले.
पूर्वीच्या लिलाव पद्धतीच्या व्यवस्थेतून मंदिर समितीस मिळणाऱ्या
उत्पन्नापेक्षा ही रक्कम चौपट जास्त असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली