गुप्त धनाच्या खोदकाम प्रकरणी परंडा पोलीसात गुन्हा नोंद

रिपोर्टर.. :गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी भूम तालुक्यातील माणकेश्‍वर येथे मठाच्या आवारातील झाडाजवळ खोदकाम केल्याप्रकरणी पुणे  गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकासह बार्शी शिवसेना प्रमुख व इतर बारा ते तेरा जणावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.



 मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास माणकेश्‍वर येथील विश्‍वरूपा नदीच्या कडेला असलेल्या बप्पासाहेब मारुती जाधव ( यांच्या गट नं ३७६ मधील शेतात काही लोक खोदकाम करीत होते.यावेळी काही शेतकर्‍यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ या खोदकामास विरोध केला.यावेळी नागरिक आल्याचे पाहून खोदकाम करणार्‍या या लोकांनी वाहनातून पळ काढला तर गावकर्‍यांनी यातील एकास पकडून पोलिसांच्या हवाली केले.
याप्रकरणी बप्पासाहेब मारुती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत रविवारी रात्री परंडा पोलिस ठाण्यात भाऊसाहेब आंधळकर, दीपक भाउसाहेब आंधळकर (रा. बाश्री), बापू मच्छिद्र अंधारे, उमाकांत किशन किजगज (रा. माणकेश्‍वर), वसंत चव्हाण (रा. नळदुर्ग), गणपत गुलाब कातुरे यांच्यासह इतर १२ ते १३ जण एमएच 0४/डी वाय ७३८५, व एमएच२५/आर २0६६ या क्रमांकाच्या दोन वाहनातून शनिवारी रात्री शेतात आले होते, असे म्हटले आहे. या लोकांनी सदरील जमिनीतील महापुरुषाच्या झाडाजवळ गुप्त धन काढण्याच्या उद्देशाने पूजा-अर्चना केली व त्या ठिकाणी खोदकाम करुन जमिनीचे नुकसान केले, असेही या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यावरून वरील सहाजणांसह इतर १२ ते १३ जणावर भादंवि कलम १४३, १४९, ४४७, ४२७ तसेच जादुटोणा प्रतिबंधक कायदा सन २0१३ कलम ३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात असून, तपास पोहेकॉ ए.बी.विभुते करीत आहेत. दरम्यान, गणपत कातुरे याला रात्री उशिरा अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले