आशियातील दुसऱ्या केंद्राचे मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमीपूजन





    मुंबई,रिपोर्टर..
दि.9 : कॅन्सरवरील प्रभावी उपचारांसाठी उपयुक्त असलेले हायड्रॉन बीम थेरपी हे अद्ययावत तंत्र आता टाटा मेमोरियल रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात येणार असून विशेषत: महिला आणि बालरुग्णांमधील कॅन्सरवर अद्ययावत पध्दतीने रेडिएशन थेरपी देणाऱ्या या केंद्राचे भूमीपूजन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते शुक्रवार, 10 जानेवारी रोजी दुपारी 3.50 वाजता टाटा मेमोरियल रुग्णालय, परेल येथे होणार आहे.  आशिया खंडातील  हे दुसरे तर देशातील हे पहिले केंद्र मुंबईत सुरु होणार असून यासाठी  राज्य शासनाने विनामुल्य जमीन उपलब्ध करून दिली असून केंद्र सरकारने नुकतेच यासाठी 450 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  या केंद्राच्या  उभारणीसाठी   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  पाठपुरावा केला होता.
    देशात दरवर्षी 40 हजार मुलांना कॅन्सरचा विळखा पडत असून गेल्यावर्षी  महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  या रुग्णांना या नव्या तंत्राच्या उपचार पध्दतीचा फायदा होणार आहे.  या तंत्रामुळे रुग्णाच्या शरीरात योग्य प्रमाणात तसेच नेमक्या ठिकाणी रेडीएशन थेरपी शक्य होणार असून यामुळे कमीत कमी त्रास होणार आहे.  केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या संशोधकांनी हे केंद्र विकसित केले आहे.  या ठिकाणी उपचारांव्यतिरिक्त कॅन्सरवरील संशोधन तसेच अभ्यासाची संधी देखील उपलब्ध होणार असल्यामुळे या केंद्राचे महत्व आहे.
-----०-----