राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना : आरोग्य पत्र वितरणासाठी सामंजस्य करार

बातमी
नागपूर रिपोर्टर..: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्यपत्र लाभार्थ्यांना तातडीने आणि वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासन आणि टपाल विभाग यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार झाला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी आणि मुख्य टपाल महाव्यवस्थापक के.सी.मिश्रा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये वर्षभरात सुमारे 1 लाख 10 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या योजनेला राज्यात मिळालेला प्रतिसाद पाहता दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण राज्यभर ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना आरोग्य पत्र वितरीत करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या महा ई सेवा केंद्र तसेच संग्राम केंद्रातर्फे आरोग्य पत्र वितरणाचे काम सुरु असून लाभार्थ्यांना अधिक जलदगतीने आरोग्यपत्र मिळावे, यासाठी टपाल विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. टपाल विभागाने अधिक जलदगतीने सेवा देऊन लाभार्थ्यांना वेळेवर आरोग्यपत्र पोहोचविण्यासाठी सेवा द्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी म्हणाले, लाभार्थ्यांना तातडीने व वेळेवर आरोग्यपत्र मिळावे यासाठी आणि टपाल विभागाचे राज्यात सर्वत्र असलेले जाळे लक्षात घेता आरोग्यपत्र वितरणासाठी टपाल विभागाची मदत घेण्यात येणार आहे. या करारामुळे टपाल कार्यालयातून लाभार्थ्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्यपत्र त्यांच्या घराजवळच मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे 12,000 टपाल कार्यालयात ही सुविधा 15 जानेवारी, 2014 पासून उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या ज्यांच्याकडे आरोग्यपत्र नाही अशा लाभार्थ्यांना शिधापत्रिकेच्या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही श्री.शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

मुख्य टपाल महाव्यवस्थापक के.सी.मिश्रा यांनी सांगितले की, टपाल विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून राज्यात सुमारे 2 हजार 217 टपाल कार्यालये संगणकीकृत आणि इंटरनेट सुविधा असलेली आहेत. त्या माध्यमातून लाभार्थ्यांना आरोग्यपत्र वितरणाची सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच उर्वरित टपाल कार्यालयांचे संगणकीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.

अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांचे संगणकीकरणाचे काम करण्यात आले असून त्या आधारावर आरोग्य पत्र छपाईसाठी डाटाबेस तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून राज्यातील 9 हजार 217 महा ई सेवा केंद्र व ग्राम पंचायत पातळीवरील 22 हजार 457 संग्राम केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य पत्र छपाई आणि वितरणाचे काम केले जात आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव ए.के.जैन, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता