जादूटोणा प्रतिबंधक विधेयक विधानसभेत मंजूर

बातमी
विधानसभा कामकाज :

नागपूर : सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मांडलेले ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे विधेयक 2013’ शुक्रवारी विधानसभेत संमत करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा नियम 154 अन्वये मांडण्यात आलेल्या या विधेयकाबाबत बोलताना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले, हे विधेयक सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे आहे. या विधेयकामुळे कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्य किंवा धर्मस्वातंत्र्यावर बंधने येणार नाहीत. व्यक्ती व धर्म स्वातंत्र्याला न्याय देणारे असे हे विधेयक असल्याचेही शिवाजीराव मोघे यांनी यावेळी सांगितले.

या विधेयकाच्या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, सुभाष देसाई, कॅ.नामदेव उसेंडी, प्रविण दरेकर, गिरीष बापट, अबु आझमी, रविंद्र वायकर, बबनराव पाचपुते, बच्चु कडू, बाळा नांदगावकर, सुरेश हाळवणकर, प्रशांत ठाकुर, एकनाथ शिंदे, राहुल बोंदरे, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस, अशोक पवार, श्रीमती मिनाक्षी पाटील आदींनी भाग घेतला.
 
भंडारा जिल्ह्यातील पुस्तक प्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी- शालेय शिक्षण मंत्री
राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र भंडारा जिल्ह्यामध्ये इयत्ता पहिली व दुसरी साठी 3 हजार 297 वाढीव पुस्तकांची आवश्यकता असल्याने व याबाबतची मागणी उशीराने नोंदविल्याने या पुस्तकांना विलंब झाला. या सर्व प्रकरणाची हे अधिवेशन संपण्यापूर्वी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

शासनातर्फे भंडारा जिल्ह्यासह राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषदांतर्गत असलेल्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होऊ शकली नसल्याबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोले, विजय वडेट्टीवार, गणपतराव देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना श्री.दर्डा म्हणाले, संपूर्ण राज्यात पहिली ते आठवीची पुस्तके जून महिन्यात 98 टक्के तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात 2 टक्के अशी संपूर्ण पुस्तके वेळेवर वितरित करण्यात आली आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यातील 36 शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु करण्यासाठी उशीरा प्रस्ताव प्राप्त झाला. ही मागणी वेळेत झाली नाही त्यामुळे पुस्तक वितरीत करण्यास उशीर झाला. या सर्व प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही श्री.दर्डा यांनी सांगितले.
 
म्हसळा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थलांतर प्रकरणी संचालकांमार्फत चौकशी- राजेश टोपे
रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यांनतर इमारतीचे किरकोळ बांधकाम व अन्य सार्वजनिक सुविधा प्रलंबित असल्याने इमारतीचा ताबा घेण्यात आला नाही. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यास विलंब झाला. या संपूर्ण प्रकरणाची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांमार्फत चौकशी करुन दोषी आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री भरतशेठ गोगावले, प्रवीण दरेकर, मिनाक्षी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना श्री.टोपे म्हणाले, राज्यात सर्वाधिक औद्योगिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था असून ज्या ठिकाणी नगरपालिका आहेत तिथे दोन सत्रात तर जिथे महानगरपालिका आहे तिथे तीन सत्रात हे वर्ग सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.