जिल्हास्तरीय अपंग क्रीडा स्पर्धा : मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ

उस्मानाबाद रिपोर्टर..: समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषदेच्या वतीने श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे आयोजित अपंगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय अपंग क्रीडा स्पर्धेचे आणि सांस्कृतिक स्पर्धांचे परितोषिक वितरण करण्यात आले. मागील तीन वर्षापासून या अपंग क्रीडा स्पर्धा होत आहेत. यावेळी जिल्ह्यातील 20 शाळांना या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. विजयी स्पर्धक अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरावरील स्पर्धेत हे खेळाडू सहभागी होणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.वैशाली कडूकर, जिल्हा आरोग्य अधिकारी रईस हाश्मी, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, श्रीमती कांचन तावडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी खुशाल गायकवाड, भारत कांबळे, सुभाष शिंदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

डॉ.व्हट्टे म्हणाले की, अपंगांना जीवनात स्वाभिमाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे जीवन कसे अर्थपूर्ण होईल तो त्यांचा हक्क आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्पर्धेच्या शेवटी यश-अपयश ठरत असते. या स्पर्धेत अपंगाचा सहभाग हाच त्यांचा गौरव आहे. खेळापेक्षा खिलाडू वृत्ती जोपासून अपंगांनी दूरदम्य इच्छाशक्तीच्या आधारावर प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांनी आवाहन करुन स्पर्धा आयोजकांनी यावेळी त्यांनी धन्यवाद दिले.

यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.कडूकर म्हणाल्या की, अपंग पाल्यांचे पालकत्व स्विकारणे हे मातांसाठी एकप्रकारे आव्हान असते. अपंग मुलांना सांभाळणाऱ्या माता येणाऱ्या अडचणींवर मात करुन आपल्या मुलांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करतात त्या मातांचे मी मनापासून कौतूक करते. अशा स्पर्धांच्या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांना जगण्यासाठी नवचैतन्य मिळते, ही आनंददायी बाब आहे, असे सांगून जिल्ह्या अपंगासाठी विशेष उपक्रम घेऊन स्पर्धा घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे बी.टी.नादरगे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडल्याबद्दल संस्थांच्या वतीने संयोजक खुशाल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी मान्यवरांच्या हस्ते ध्वज उतरवून स्पर्धेची सांगता करण्यात आली.