अणदूरच्या श्री खंडोबाचे मैलारपुरात आगमन

अणदूर - हलकीचा विशिष्ठ ठेक्यावर बेभानपणे नाचणारे वारू, भंडारा आणि खोब-याची मुक्त उधळण आणि येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोषामुळे अणदूरचा श्री खंडोबा मंदिर परिसर मंगळवारी दिवसभर आणि रात्रभर दुमदुमून गेला होता.
दरवर्षी मराठी तिथीनुसार मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा तथा देवदीपावलीला अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा भरते. यंदाची यात्रा मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी पार पडली. पहाटे चार वाजता काकड आरती झाल्यानंतर, गावातील पाचशेहून अधिक महिलांनी तसेच काही पुरूषांनी आपल्या घरापासून ओल्या कपड्यांनी दंडवत घालून श्री खंडोबाचे दर्शन घेतले.सकाळी दहा वाजता श्री खंडोबास अभिषेक करण्यात आला आणि महाअलंकार पुजा करण्यात आली.त्यानंतर अणदूर ग्रामस्थांनी आपापल्या घरी पुरण - पोळीचा नैवेध दाखविला.तसेच गावागावाहून आलेल्या भक्तांनी भंडारा तसेच खोबरे उधळून, येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.दिवसभर नवससायाचे कार्यक्रम पार पडले.
सायंकाळी सातनंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाली. अनेक गावचे वारू हलकीच्या तालावर बेधुंदपणे नाचत श्री खंडोबा यात्रेसाठी दाखल झाले.रात्री दहा वाजता श्री खंडोबाची पुजा करण्यात आल्यानंतर श्रीचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला. फुलांनी सजावट केलेल्या पांढ-या शुभ्र घोड्यावर जेव्हा श्री खंडोबाचा छबिना निघाला, तेव्हा मंदिर परिसर भक्तीभावाने डुंबून निघाला.समोर हलकीच्या तालावर नाचणारे वारू, त्यामागे धनगरी ढोल, पाठोपाठ मृदंग, जगंट, पितळी टाळांच्या गजरात पुजा-यांनी एका सुरात गायिलेले खंडोबा स्तोत्र यामुळे वातावरण भारावून गेले.घोड्याने दोन प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री बारा वाजता छबिन्याची सांगता करण्यात आली.याचवेळी नळदुर्गच्या मानक-यांचे आगमन झाले.यानंतर अणदूर आणि नळदुर्गच्या मानक-यांमध्ये हस्तांदोलन करण्यात आल्यानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहापान करण्यात आली तसेच पान - सुपारी देण्यात आली.त्यानंतर मंदिराच्या गाभा-यात दोन्ही गावच्या मानक-यांत श्री खंडोबाची मुळ मुर्ती नेणे आणि आणण्याचा लेखी करार करण्यात आला.यावेळी मुख्य मानक-यांचा फेटा बांधून तर अन्य मान्यकरांचा टोपीत फुलांचा तुरा घालून आणि प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर श्री खंडोबाची पत्नी म्हाळसाबाई, हेगडीप्रधान यांच्या मुत्र्या मैलारपूरकडे मार्गस्थ झाल्या.श्री खंडोबाची मुळ मुर्ती सजावट करण्यात आलेल्या पालखीत ठेवण्यात आल्यानंतर मध्यरात्री सव्वादोन वाजता श्री खंडोबा पावनेदोन महिन्याच्या वास्तव्याकरिता मैलारपूरकडे निघाले. श्री खंडोबाची पालखी जात असताना, वाटेत भाविकांनी जागो जागी पालखीचे दर्शन घेतले. वाजत - गाजत चार किलो मीटर अंतर चालल्यानंतर बुधवारी पहाटे साडेचार वाजता श्री खंडोबाचे मैलारपुरात आगमन झाले.पाच वाजता मुख्य गाभा-यात मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.यावेळी श्री खंडोबाची साधी पुजा करण्यात येवून, पंचारती म्हणण्यात आली. दहा मिनीटांनी मंदिराचा गाभारा बंद करण्यात आला आणि साडेपाच वाजता पुन्हा काकडआरती करण्यात येवून, मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.त्यानंतर श्री खंडोबा पालखीसोबत आलेल्या अणदूर आणि नळदुर्गच्या सर्व भाविकांना श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने शि-याचा प्रसाद वाटप करण्यात आला.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि श्री खंडोबा यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.