कांदा निर्यात मूल्य रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार -- केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार

बातमी
नाशिक रिपोर्टर..: कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण थांबविण्यासाठी कांदा निर्यात मूल्य रद्द करण्यासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांनी आज मातेरेवाडी (ता. दिंडोरी) येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना दिली.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या मातेरेवाडी-राजारामनगर (ता. दिंडोरी) येथील नूतन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन ना. पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कारखान्याच्या आवारात झालेल्या मेळाव्यात ना. पवार बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते.

ना. पवार पुढे म्हणाले, की अडचणीच्या काळात प्रामाणिकपणे कारखाना चालवीत तो आर्थिक संकटातून श्री. शेटे यांनी बाहेर काढला आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे उसाचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन अधिक होणार आहे. कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळत असतील, तर माझी हरकत नाही. कांद्याचे दर कमी होतात त्यावेळेस कोणी बोलत नाही. अशा परिस्थितीत कांद्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच निर्यात मूल्य कमी केले आहे. आता पुन्हा निर्यात मूल्य रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबत दिल्लीत गेल्यावर निर्णय घेण्यात येईल. टँकरने पाणी आणून पिके वाचविणाऱ्या शेतकऱ्याला त्याने गाळलेल्या घामाची किंमत मिळायला पाहिजे. गेल्या वर्षी देशाची अन्नधान्याची गरज भागवून अन्नधान्याची निर्यात केली. शेतकऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे 1 लाख 20 हजार कोटी रुपये सबसिडीची अन्न सुरक्षा योजना राबविणे शक्य होणार आहे, असेही ना. पवार यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी भारत कांदा निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा, गहू, साखर, कापूस निर्यात करणारा दुसरा देश ठरला होता, असेही ना. पवार यांनी गौरवाने नमूद केले. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू केली पाहिजे, अशी सूचना करुन ना. पवार यांनी सांगितले, की जगाच्या बाजारपेठेत शेतकरी पोहोचला, तर देशाची प्रगती होईल. त्याच्याकडे पैसा आला, तर तो माल खरेदी करू शकेल. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करीत उत्पादन वाढविले पाहिजे. उसात आंतरपिके घेतली पाहिजेत. त्यातून अन्नधान्याचा खर्च काढता येणे शक्य आहे. कमी कालावधीत येणारी पिके घेतली पाहिजेत. ठिबक सिंचनाचा वापर वाढवीत पाणी बचत केली पाहिजे, असेही ना. श्री. पवार यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री ना. भुजबळ म्हणाले, की श्री. शेटे यांनी केलेल्या निरपेक्ष कार्यामुळे कादवा कारखाना नफ्यात आला आहे. कादवा कारखाना परिसरात विकासाची विविध कामे सुरू आहेत, असेही ना. भुजबळ यांनी नमूद केले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष श्री. शेटे यांनी केले. ते म्हणाले, की आदिवासी भागाचा कायापालट, विकास व्हावा म्हणून कारखाना सुरू झाला. कारखान्याला आता 1 कोटी 19 लाख रुपयांचा नफा झाला आहे. उसाला 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जात आहे. बाहेरून ऊस आणून कारखान्याचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे, तर उपलब्ध मनुष्यबळावरच कारखान्याचे कामकाज सुरू आहे. माजी आमदार श्री. झिरवळ यांनी आभार मानले.