खेळामुळे बुद्धीला चालना मिळते- खासदार डॉ.पाटील

उस्मानाबाद  रिपोर्टर.. : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषदेच्यावतीने श्रीतुळजाभवानी क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय दोन दिवसीय अपंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करुन आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेस प्रारंभ केला. या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी संचलन करुन मानवंदना दिली. सर्व खेळाडुंना बी.पी.नांदरगे यांनी शपथ दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी खुशाल गायकवाड, रसीक काझी, सुरेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ.पाटील म्हणाले, अपंग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, खेळात संधी मिळावी, त्यांच्या कला कौशल्यांना संधी मिळावी, त्यांच्यातील न्युनगंड दूर व्हावा तसेच समाजाचा अपंगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा, यासाठी क्रीडा स्पर्धा घेणे आवश्यक आहे. डॉ.पाटील पुढे म्हणाले की, खेळाच्या माध्यमातून अपंगत्वावर मात करता येते. त्यांना समाजात स्वाभिमानाने जीवन जगता येते. खेळ खेळल्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. शिवाय त्यांचे शरीर निरोगी राहते. खेळाडूंनी नियमित खेळ खेळत रहावे, असेही ते म्हणाले. दरवर्षी 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय अपंग मुला-मुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे डॉ.पाटील यांनी समाज कल्याण विभागाचे कौतूक केले.

डॉ.व्हट्टे म्हणाले की, विद्यार्थी शरीराने अपंग असले, तरी मनाने ते अपंगात्वावर मात करुन विविध क्षेत्रात पुढे जात आहेत. त्यांचा स्वाभिमान टिकविण्यासाठी अशा स्पर्धाचे नियमित आयोजन केलेच पाहिजे. स्पर्धा म्हटली की, जय पराजय असतोच. त्यांची खेळाडुंनी खंत न बाळगता खेळ खेळून खिलाडूवृत्ती जोपासावी, तसेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात खुशाल गायकवाड म्हणाले की, या स्पर्धेत मुकबधीर 178, अस्थिव्यंग-138, मतिमंद-57, अंध 22 असे एकूण 395 स्पर्धेक सहभागी झाले असून या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत. यात 25 मीटर भरभर चालणे, 50, 100, 200, 400 मीटर धावणे, व्हील चेअरवर बसून सॉफट बॉल थ्रो, गोळा फेक, लांबउडी, बुद्धीबळ आदी स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. गेल्यावर्षी सोलापूर येथील क्रीडा स्पर्धेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत 16 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कास्य पदके प्राप्त केल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तुंची पाहणी मान्यवरांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी परीश्रम घेत आहेत.