नरेंद्र मोदींनी मुंबईत घेतलेल्या महागर्जना रॅलीत व्होट फॉर इंडियाचा नारा

रिपोर्टर..भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मुंबईत घेतलेल्या महागर्जना
रॅलीत व्होट फॉर इंडियाचा नारा देत काँग्रेसव घणाघाती हल्ला चढवला. मोदींनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर बोलताना, देशाच्या सर्व समस्यांचं कारण इथली जनता, भूगोल, इतिहास किंवा निसर्ग नसून काँग्रेसशासित सरकार आहे आणि या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न साकार करावं लागेल, असं म्हणाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी नाही तर देशासाठी मत द्या, असं आवाहन करत मोदींनी व्होट फॉर इंडियाचा नवीन नारा दिला आहे.
नरेंद्र मोदींच्या या महागर्जना रॅलीला प्रचंड गर्दी झाली होती. भाजपच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणानंतर नरेंद्र मोदींचं भाषण झालं. मुंबईतूनच सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देत, या देशाला काँग्रेसमुक्त करा, असा नारा मोदींनी दिला. विकासाची धोरणं, रोजगार, महागाई, शिक्षण, वीजपुरवठा या सगळ्या मुद्द्यांबरोबरच मोदी तरुणांच्या कल्याणावर बोलले. मी पक्षासाठी मत मागत नाही, असं सांगत देशासाठी मत द्या, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आणि व्होट फॉर इंडियाचा नारा दिला. मुंबईकरांशी मराठीतून संवाद साधत गुजरातसाठी मुंबई हे दुसरं घर आहे, असं भावनिक आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं. मोदींच्या भाषणाआधी महाराष्ट्र भाजपनं नरेंद्र मोदींना 25 कोटी रुपयांचा चेक दिला.