नागपूर येथे कृषि वसंत-2014 राष्ट्रीय प्रदर्शनाचे 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन



         

 
लातूर, दि. 18 :-  कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात दि. 9 ते 13 फेब्रुवारी, 2014 या कालावधीत कृषि वसंत-2014 या राष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाला कृषि व संलग्न क्षेत्रातील राज्य तसेच देशभरातून एक लाखापेक्षा अधिकारी शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी , विक्रेते व ग्राहक भेट देणार आहेत. गेल्या पन्नास वर्षानंतर प्रथमच राज्यात या महत्वकांक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.   या प्रदर्शनाची जबाबदारी कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (CII) या संस्थेवर सोपविण्यात आली आहे.
या प्रदर्शनात विविध संस्था, कंपन्या , महामंडळे, शासकीय विभाग इत्यादींचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनामध्ये यशस्वी शेतकऱ्यांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी खास दालनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये उद्योजक, विक्रेते यांच्याकरिता स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. सदर स्टॉलकरिता बाहेरील मोकळ्या जागेकरिता 50 स्क्वे.मी. आणि अंतर्गत मोकळी जागा 27 स्क्वे.मी. आणि अंतर्गत तयार जागेसाठी 9 स्क्वे.मी. स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. या स्टॉल उभारणीसाठी अनुक्रमे प्रति चौ.मी. 3 हजार 500 रुपये, 5 हजार 500 रुपये आणि 6 हजार 700 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
इच्छुकांनी याकरिता संबंधित तालुका कृषि अधिकारी आणि कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, नवी दिल्ली यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक कृ. ना. देशमुख यांनी  एका परिपत्रकाव्दारे केले आहे.