जिल्ह्याचा 2014-15 चा 159 कोटी 11 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर



उस्मानाबाद रिपोर्टर..: जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2014-15 च्या 114 कोटी 20 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने आज मान्यता दिली. याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजनेच्या 43 कोटी 33 लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठीच्या 1 कोटी 58 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.

सन 2014-15 चा जिल्ह्याच्या एकूण वार्षिक आराखडा हा 159 कोटी 11 लाख रुपयांचा आहे. त्याचबरोबर सन 2013-14 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यासाठी आलेला निधी अर्खित राहून परत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.  खासदार डा. पद्मसिंह पाटील, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जि.प. अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, उपायुक्त (नियोजन) जयप्रकाश महानवर, जिल्हाधिकारी डा. के. एम. नागरगोजे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास आदींची यावेळी उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डा. नेल्सन मंडेला यांना तसेच तुळजापूर तालुक्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.