![]() |
||
मुंबई रिपोर्टर... : राज्यातील
प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात खेळांसाठी उत्तम पायाभूत सुविधांची
नितांत गरज असून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
स्तरावर पदके मिळविण्यासाठी महत्वपूर्ण सुधारणा करण्याची गरज असल्याचे
राज्यपाल के.शंकरनारायणन् यांनी आज येथे सांगितले.
स्व. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीच्या निमित्ताने बालभवनापासून राजभवनापर्यंत मुलांच्या स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान, अपर मुख्य सचिव जे.एस.सहारिया, जवाहर बालभवनचे संचालक एस.पी.सांगवे तसेच लहान मुले आणि त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बालदिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, केंद्र शासनाने शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना दिला असल्याने नजीकच्या काळात आपणास या क्षेत्रात मोठी मूक क्रांती झालेली दिसून येईल. येत्या काही वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, सर्व मुले मोकळ्या आणि संरक्षित वातावरणात वाढतील याची सामायिक जबाबदारी समाजाची असून त्यांचे कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुलांनी धुम्रपान, व्यसने, वाईट सवयी यापासून दूर रहावे. तसेच त्यांनी प्रामाणिकपणे मी देशाची सेवा करीन आणि पर्यावरणाचे रक्षण करीन अशी शपथ घ्यावी. राज्यपालांनी यावेळी मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. |