तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणामुळे 100 टक्के महसूल गोळा होईल - मुख्यमंत्री

बातमी
.
नागपूर : राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरु आहेत. राज्याच्या सीमेवर ये-जा करणाऱ्या वाहनांची पारदर्शी व विनाअडथळा पद्धतीने तपासणी करण्यासाठी 22 सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्याचे काम वेगात सुरु आहे. तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणामुळे शंभर टक्के महसूल गोळा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील राज्य महामार्ग क्रमांक 69 खुर्सापार, सावनेर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय नगरविकास व संसदीय कार्य मंत्री कमलनाथ होते. यावेळी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे, परिवहन राज्यमंत्री सचिन अहीर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची विशेष उपस्थिती होती.

या तपासणी नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक्स टॅग लावण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे, कॅमेरे, संगणक बसविण्यात आले आहेत. सर्व नाके एकमेकांना तसेच मुंबई येथील केंद्रीय नियंत्रण केंद्राशी जोडले आहेत. वाहनांना सीमा तपासणी नाक्यांवर विविध विभागाच्या तपासणीसाठी कमीतकमी वेळ लागावा हा उद्देश ठेवून हा प्रकल्प आखण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

श्री. कमलनाथ म्हणाले, सावनेरशी माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझ्या छिंदवाडा या मतदारसंघाला लागूनच नागपूर जिल्ह्याची सीमा असल्यामुळे विकास परस्परपूरक झालेला आहे. चौपदरी रस्ता व सीमा तपासणीचा अत्याधुनिक सुविधेचा नाका झाल्यामुळे व्यापाऱ्यांची खूप मोठी सोय झाली आहे.

श्री. क्षीरसागर म्हणाले, अभिनव पद्धतीच्या या प्रकल्पामुळे सहा राज्याच्या सीमा जोडल्या गेलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे प्रवासी व माल वाहतुकीची पारदर्शी तपासणी होण्यास मदतच होणार आहे. परिवहन, विक्रीकर व राज्य उत्पादन शुल्क या तीनही विभागाद्वारे शंभर टक्के वाहनांची एकत्रित तपासणी होणार आहे.

यावेळी श्री. केदार यांचेही भाषण झाले. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते तपासणी नाक्याच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी केले. दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपालरेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीप पी. तसेच विक्रीकर, परिवहन व उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.