परवानाधारक कोळी व्यावसायिकांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाची पर्यायी जागा - जयंत पाटील

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने परवाना दिलेल्या अधिकृत कोळी व्यावसायिकांना छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील जागेऐवजी पर्यायी जागा देण्याचा प्रश्न केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून मार्गी लागला असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारातील केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाची जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

काल श्री. पाटील यांच्या दालनात यासंबधी बैठक झाली. बैठकीस नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कोळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज मंडई इमारत ही मोडकळीस आल्याने पुनर्निमाणाच्या दृष्टीने मोकळी करण्याची सूचना पालिकेमार्फत देण्यात आल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, परवानाधारक अधिकृत कोळी व्यावसायिकांना इमारत पुनर्निमितीनंतर त्याच इमारतीत जागा देण्याचे महापालिकेकडून मान्य करण्यात आले आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाची जागा आहे. कोळी महिला या जागेची पहाणी करणार असून त्यांना ही जागा मान्य झाल्यास, या जागेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून केंद्रीय कृषीमंत्री श्री. पवार यांच्याकडे पाठविण्यात येईल. हा प्रस्ताव गेल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री संबंधित विभागाला ही जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देतील. जागा उपलब्ध झाल्यानंतर या जागेवर कोळी महिलांसाठी उभ्या करावयाच्या तात्पुरत्या सुविधांचे काम महापालिकेमार्फत केले जाईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.