गणित, विज्ञानाच्या 28 हजार शिक्षकांना महिनाभरात प्रशिक्षण - राजेंद्र दर्डा

मुंबई रिपोर्टर...: गणित आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या राज्यातील 28 हजार शिक्षकांना आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या मदतीने ए व्ह्यूव (A view) या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महिनाभरात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.

शालेय शिक्षण विभाग, आयआयटी आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन चर्चगेट जवळील मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थीभवनात गुरूवारी करण्यात आले, त्यावेळी श्री.दर्डा बोलत होते. ते म्हणाले, आपण एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील गणित विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर येथे प्रत्येकी दोन व नवी मुंबई, ठाणे, कांदिवली, भोईसर, अशा आठ सेटर केंद्रांचा समावेश असून त्या माध्यमातून राज्यातील गणित आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही श्री.दर्डा यांनी सांगितले.

श्री.दर्डा पुढे म्हणाले, आयआयटीच्या माध्यमातून पंढरपूर येथील शाळेत विद्यार्थांना आकाश टॅबलेट पीसीच्या वापरा बाबत आयआयटीने जो उपक्रम राबवला आहे त्याची पाहणी करून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना कसा वापर करता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करून हा उपक्रम सर्वत्र राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

याप्रसंगी राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, या प्रशिक्षणाचा राज्यातील शिक्षकांना फायदा होणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारल्याने जग जवळ आले आहे. अशा वेळी ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करण्यासाठी एक माध्यम तयार झाले आहे. देश जर महासत्ता करायचा असेल तर शिक्षण हे महत्वाचे आहे. त्यासाठी पूर्व प्राथमिक पासूनच दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे ही काळाजी गरज आहे. राज्यात प्रशिक्षण धोरण राबविले जाणार आहे. या प्रशिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण मॅाडेल विकसित करून उत्तम प्रशिक्षण दिले जाईल, असेही श्रीमती खान यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थांना गणित विषय कमीत कमी वेळेत कसा शिकवायचा, यासाठी अमृता विद्यापीठ आणि भारत सरकार यांनी विकसीत केलेल्या A VIEW या सॅाफ्टवेरचा उपयोग करून हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला आहे, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयात गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभाग वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे, असे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे.एस.सहारिया यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणमंत्री श्री.दर्डा आणि राज्यमंत्री श्रीमती खान यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राज्य प्रकल्प संचालक ए.डी.काळे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानच्या राज्य प्रकल्प समन्वयक डॉ.सुवर्णा खरात, आय.आय.टी.च्या माधुरी सावंत, मुंबई विद्यापीठाचे दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.