न्यूयॉर्कमध्ये रोड शोच्या माध्यमातून दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज

मुंबई रिपोर्टर: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे न्यूयॉर्क येथे दि. 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या `महाराष्ट्र दिवाळी ॲट टाइम्स स्क्वेअर` या महासोहळ्याच्या प्रसिद्धीसाठी न्यूयॉर्क येथे आज रोड शोचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या पर्यटन आणि संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या रोड शोमुळे महाराष्ट्राचा आवाज न्यूयॉर्कमध्ये दुमदुमला. उद्या दि. 22 सप्टेंबरला टाइम्स स्क्वेअर येथे दिवाळी सोहळा साजरा होणार आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सुमित मलीक, अमेरिकेतील भारताचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

न्यूयॉर्कच्या ट्रॅव्हल ट्रेड या ठिकाणी रोड शोला सुरूवात झाली. प्रख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी `जय महाराष्ट्र` हे गीत सादर केले. यावेळी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे तसेच विविध कलांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून न्यूयॉर्कमध्ये महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले होते. या रोड शो ला हजारो नागरीकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे न्यूयॉर्क पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. त्यामुळे उद्या दि. 22 सप्टेंबर रोजी जगविख्यात टाइम्स स्क्वेअर येथे होणाऱ्या दिवाळी कार्यक्रमासाठी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या सोहळ्याचा अर्ध्या तासाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.