डॉकयार्ड इमारत दुर्घटना : बचाव मोहिमेला संपूर्ण मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई रिपोर्टर.. : शुक्रवारी पहाटे डॉकयार्ड रोड येथे मुंबई मनपाच्या बाजार खात्याच्या अखत्यारीतील मनपा कर्मचाऱ्यांसाठी असलेली एक जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने महानगरपालिका तसेच राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन बचाव कामाला संपूर्ण प्राधान्य देण्याच्या तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

ही दुर्घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करणे हे सर्वोच्च प्राधान्य असून त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी मदत कार्यात सहभागी होऊन या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे 65 जवान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक त्या यंत्रसामुग्रीसह बचाव कार्य सुरू केले आहे. घटनास्थळी 12 अग्निशमन गाड्या, चार रूग्ण्वाहिका, दोन रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. माझगाव डॉक नागरी संरक्षण दल, बीईएसटी त्याचप्रमाणे केसी महाविद्यालयाचे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थीदेखील या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. याशिवाय ठाणे येथील अग्निशमन दलही दाखल झाले आहे. या संदर्भात आणखीही काही मदत लागली तर राज्य शासन ती पुरवेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, त्याचप्रमाणे पुरेशा अद्ययावत रूग्णवाहिका तयार ठेवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी जे.जे.रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना या संदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत.

ही दुर्घटनाग्रस्त इमारत 1980 या वर्षीची असून 30 ते 32 वर्षे जुनी आहे. तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सी 2 या प्रवर्गात येते. या इमारतीत 21 कुटुंब राहत आहेत, अशी माहिती श्री.जलोटा यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.