जिल्ह्यातील एकही मतदार ओळखपत्रापासून वंचित राहू नये - अपर विभागीय आयुक्त मवारे

उस्मानाबाद रिपोर्टर..: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन या जिल्ह्यातील एकही मतदार, मतदान ओळखपत्रापासून वंचित राहू नये, अशा मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश अपर विभागीय आयुक्त गोकूळ मवारे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे दि. 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भालचंद्र चाकूरकर, तहसीलदार सुभाष काकडे, कळंब चे तहसीलदार श्री.शिंदे, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांची उपस्थिती होती.

श्री.मवारे म्हणाले, सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची माहिती करुन घ्यावी. हा कार्यक्रम 16 सप्टेंबर, 2013 ते 6 जानेवारी, 2014 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व पात्र मतदारांची नोंदणी कशी होईल, फोटोसह मतदार याद्या अचूक कशा होतील याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले, मतदार वंचित राहू नये यासाठी संगणक ज्ञान व प्रशिक्षणाचे महत्व किती आहे हे स्पष्ट केले.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री.चाकूरकर, तहसीलदार श्री.काकडे यांनी 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ व 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघ या मतदार संघातील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.