![]() |
||
वर्धा रिपोर्टर: अतिवृष्टी
व पुरामुळे बाधित झालेल्या समुद्रपूर तालुक्यातील उमरा, गौळ, भोसा आणि
कांढळी येथील शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय कृषी आणि अन्न
प्रक्रिया उद्योग मंत्री शरद पवार यांनी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी
थेट संवाद देखील साधला.
यावेळी श्री. पवार यांच्या समवेत राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. पावसामुळे शेडनेटचे संपूर्णतः नुकसान झालेल्या उमरा येथील मनोहर चंद्रभान भिसे यांनी श्री. पवार यांना झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. शेडनेटमध्ये शीमला मिरचीचे उत्पादन घेण्यात आले होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसह शेडनेटचे संपूर्णपणे नुकसान झाल्याचे श्री. भिसे यांनी यावेळी सांगितले. श्री. पवार यांनी झालेल्या नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे किंवा कसे याबाबत प्रशासनाला विचारणा केली. त्यावर हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी नकाशाद्वारे गावातील एकूण परिस्थितीची माहिती दिली. तसेच या भागातील सर्व पंचनामे झाले असून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले. सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती भोसा याठिकाणच्या भेटीदरम्यान सरपंच गणेश अंड्रसकर यांनी दिली. गौळ येथे रामचंद्र देशपांडे यांच्या खरडून गेलेल्या शेताची पाहणीही श्री. पवार यांनी केली. तसेच येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीशी व लोकांच्या भावनांशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. कांढळी येथे सरपंच राजेश थोरात यांनी गावातील नुकसानीची माहिती सांगून यापुढे नुकसान होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा विनंतीचे निवेदन सादर केले. यावेळी कानकाटी, कांढळी, तांभारी, चाकूर, कोरी व मजरा ग्रामस्थांनीही शेतीपिकांच्या नुकसानीबाबत निवेदन दिले. |