![]() |
||
![]()
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
|
||
पुणे रिपोर्टर.. :
खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असल्यामुळे
राज्य शासनाचे खासगी क्षेत्रात गुंतवणूकीस प्राधान्य आहे, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज कॉर्निंग इंडिया कंपनीच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, अमेरिकेचे भारतातील कौन्सिल मेंबर पीटर हास, कंपनीचे उपाध्यक्ष स्टीफन मेलर आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रूस्तम देसाई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, `आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून सरकारी क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. परंतु खासगी क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा पुरविणे, कुशल मनुष्यबळ विकसित करणे, गुंतवणूक आणि उद्योगाला पूरक असे वातावरण निर्मिती करणे याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे`. खासगी गुंतवणुक आकर्षित करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि औद्योगिक प्रकल्पाना अनुकुल धोरण ही राज्याची बलस्थाने आहेत. या घटकांचा विचार करून खासगी गुंतवणूकदार महाराष्ट्राला प्राधान्य देतात. यापुढेही खासगी गुंतवणूकदारांसाठी राज्य शासन सर्व ती मदत देईल. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवेल, असे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी हे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान आहे. भारताच्या विकासासाठी हे तंत्रज्ञान खूपच गरजेचे आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान वापरण्यात भारत आघाडीवर असेल, असेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प भारत आणि अमेरिकादरम्यानचे व्यावसायिक स्तरावरील संबंध आधिक दृढ होण्यास उपयुक्त ठरेल आणि अमेरिकेतील आणखी कंपन्या भारतात, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि आमदार दिलीप मोहिते, कंपनीचे उपाध्यक्ष स्टिफन मेलर यांचीही भाषणे झाली. व्यवस्थापकीय संचालक रूस्तम देसाई यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले. यावेळी उद्योग विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा, एमआयाडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, एमआयाडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. |