किमान आधारभूत मूल्यांवर खरेदी करण्यासाठी 100 कापूस खरेदी केंद्रे उघडणार - राधाकृष्ण विखे-पाटील

  
मुंबई रिपोर्टर..: किमान आधारभूत मूल्यांवर कापूस खरेदी करण्यासाठी केंद्र सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली असून कापूस पणन महासंघातर्फे सुमारे 100 कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत, असे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

हंगाम 2013-14 साठी कापूस खरेदीच्या पूर्व तयारीसाठी गुरूवारी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी.हिराणी, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्याम तागडे, व इतर अधिकारी उपस्थित होते.

कापूस पणन महासंघाने व्यापारी तत्वावर कापूस खरेदी करण्यासाठी राज्यातील सहकारी सूत गिरण्या, कापड गिरण्या, कापूस खरेदी ठेकेदार, यांच्याशी विचारविनिमय करुन प्रायोगिक कमिशन तत्वावर स्वखर्चाने योजना राबविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करावा, अशा सूचना देऊन श्री.विखे-पाटील म्हणाले, नाफेडने तयार केलेल्या करारनाम्याच्या मसुद्याचे अवलोकन करुन आवश्यक त्या योग्य सुधारणा करुन त्यानुसार करारनामा तयार करण्यात यावा. कापूस खरेदीच्याव वेळी शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतील निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच कापूस पणन महासंघाने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांच्या सहकार्याने धान, सोयाबीन, तूर, उडीद, मूग इ.च्या खरेदीसाठी पणन महासंघाच्या धर्तीवर कमिशन बेसवर खरेदी करण्याबाबत कापूस पणन महासंघ व पणन महासंघाने संयुक्तपणे बैठक घ्यावी. सन 2008-09 मध्ये कापूस खरेदीपोटी नाफेडकडे प्रलंबित असलेली महासंघाची रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.